शिवमल्हार २०२३ ला लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे आनंद,उत्साह व जल्लोषात सुरुवात!!

शिवमल्हार २०२३ चा आनंद,उत्साह व जल्लोषात!!
लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवमल्हार २०२३ चा प्रारंभ झाला आहे.यंदाचा शिवमल्हार २०२३ महोत्सव अतिशय आगळावेगळा असून या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेते शशांक केतकर व फियाट इंडिया लिमिटेडचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट राकेश बावेजा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना शिवसेना उपनेते, मा.खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी ते म्हणाले की,प्रत्येक वर्षी या शिक्षण संस्थेच्या वतीने नवनवीन व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा मानस असतो. कोरोना कालावधीत मिळालेल्या वेळेत या संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता उच्च दर्जाचे प्रेक्षागृह तसेच अद्यावत क्रिकेटचे मैदान उभारले आहे.
नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत शाळेच्या एका विद्यार्थिनीने 99.40% गुण मिळवून संस्थेचे व आपल्या कुटुंबीयांचे नाव उज्वल केले. सायली गांजाळे या शाळेतील विद्यार्थिनीने बालेवाडी येथील राष्ट्रीय स्तरावरील ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. तसेच स्वीडनमध्येही कांस्यपदक मिळविले आहे. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी परदेशातही उच्च पदांवर काम करीत असून अनेक विद्यार्थी देशातील विविध क्षेत्रात उच्चस्थानी आहेत. या शाळेतीलच एक विद्यार्थिनी नुकतीच सीएच्या परीक्षेत देशात १६वी आली आहे. इथल्या चांगल्या शिक्षण व्यवस्थेमुळेच हे साकार झाले असून येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याने जगाच्या पाठीवर आपल्यातील आगळवेगळे पण दाखवावे व आपले कर्तुत्व चमकवावे हीच माझी इच्छा आहे असेही आढळराव पाटील यांनी या प्रसंगी सांगितले.
आज या संस्थेने २५व्या वर्षात पदार्पण केले आहे. या पंचवीस वर्षांच्या प्रवासात माझ्या लांडेवाडीचे ग्रामस्थ व पालक यांची साथ तितकीच तोला-मोलाची राहिली आहे. या शाळेतील माझ्या सर्व शिक्षक वर्गाने आजपर्यंत अतिशय मेहनत घेऊन संस्थेचे नाव उज्वल होण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. यापुढील काळातही संस्थेतून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतील असा विश्वास यावेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
सिने कलाकार शशांक केतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इथली शाळा पाहून मी आवक झाल्याचे सांगितले. शाळा कशी असावी हे शहरातल्या शाळांनी इथे येऊन पाहण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करीत आपण चांगल्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षण घेतो तेव्हा भविष्यकाळातही आपल्याला त्याचा चांगलाच उपयोग होतो. आपलं शिक्षण आपल्याला attitude देतं असं मत त्यांनी व्यक्त केलं.