११ सप्टेंबर “राष्ट्रीय वन हुतात्मा दिन”

पंचनामा विशेष -गायत्री राजगुरव अवधानी
एम.एस.सी.एम.फिल (झूलॉजी)
वन्यजीव अभ्यासक
११ सप्टेंबर “राष्ट्रीय वन हुतात्मा दिन”
पंचनामा विशेष -गायत्री राजगुरव अवधानी
एम.एस.सी.एम.फिल (झूलॉजी)
वन्यजीव अभ्यासक

पंचनामा विशेष – निसर्गातील एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण वनांकडे पाहतो. वने ही आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. वर्षांनुवर्षे आदिवासी लोक हे वनांवर जगत आले आहेत. जंगलापासून मिळणाऱ्या लाकूडफाटा, औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारची तेले, मध, फळे, कंदमुळे, रानभाज्या, डिंक, लाख, काथ्या, खैर अशा अनेक गोष्टी ते वनांमधून मिळवतात. वने ही आदिवासींसाठीच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी महत्त्वाची आहेत. परंतु ही वने मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. झपाट्याने वाढणारे शहरीकरण, उद्योगधंदे, डांबरीकरण, गुरेचराई, तसेच होणारे प्रदूषण, उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चामाल, यामुळे होणारी वृक्षतोड ही एक गहन समस्या बनली आहे. नुकतीच घडलेली तेलंगाना येथील घटना आपल्या डोळ्यासमोर ताजी आहे. हैदराबाद विद्यापीठाजवळील कांचा गची बोवली हे तेलंगानातील ४०० एकर क्षेत्रफळातील जंगलाची किती वाताहत केली ते सांगायला नको. या सर्व गोष्टी कुठेतरी थांबणे महत्त्वाचे आहे. हे सारं असेच सुरू राहिलं तर जंगलांची वाळवंट होण्यास फार उशीर लागणार नाही.
एक ५० वर्षाच झाड मानवाला किती उपयोगी ठरवू शकतो हे आपण पाहूयात अशा एका झाडापासून खूप मोठ्या प्रमाणात वायूचे शुद्धीकरण केलं जातं, ऑक्सिजनचे उत्पादन होतं, पाण्याचा रिसायकलिंग होतं, हवेतील कार्बनच प्रमाण कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होते, मातीमध्ये पालापाचोळ्याची भर पडून जमिनीचा कस सुधारतो, झाडांची मूळ माती घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप थांबते, असा जुना बहरलेला मोठा वृक्ष हे असंख्य पक्ष्यांचं निवासस्थान असतं, अशा झाडांवर मधमाशांच्या पोळ्यांची संख्या चांगली असते. हे झाड आपल्याला लहानपणीच्या पांगुळ गाड्या पासून ते तारुण्यातील आराम खुर्ची पर्यंत, वार्धक्यातील हातातल्या काठी पासून ते स्मशानातील लाकड्यापर्यंत साथ देते. वृक्षांचे महत्त्व सांगाव तेवढे कमीच.
ह्या जंगलाचे महत्व ज्याला खऱ्या अर्थाने समजलं त्यांनी जंगल तोडीला अटकाव करण्यासाठी अक्षरशः स्वतःचे प्राण पणाला लावले आणि काहींनी वन हक्कासाठी वनांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि वन हुतात्मा झाले. त्यांचे स्मरण व्हावे यासाठी राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून ११ सप्टेंबर हा दिवस आपण साजरा करतो.
वन हुतात्मा दिनाचं जेव्हा स्मरण होते तेव्हा आठवण होते ती राजस्थान मधील खेजडली या गावाची. या गावाला खेजडली हे नाव पडलं ते तेथील असलेल्या खेजडीच्या झाडांमुळे. इ.स १७०० च्या दरम्यान एक राजा होऊन गेला त्याचं नाव महाराजा अजित सिंग. यांनी खेजडीची झाडे तोडण्यास बंदी केली त्यानंतर त्यांचा मुलगा राजा अभयसिंग यांनी स्वतःच्या महालाच्या बांधकामासाठी चुनखडी भाजायला जळाऊ लाकूड म्हणून खेचडीची झाडे तोडण्याचा हुकूम दिला. वर्षानुवर्षे गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारी ही झाडे जमिनीवर कोसळू लागली. हे सर्व अमृता देवींनी पाहिल. त्यांना हे सर्व पहावेना, त्यांनी वृक्षतोड थांबावी म्हणून सर्वांना खूप विनवलं. त्या बोलत होत्या “ही झाडे म्हणजे गावकऱ्यांचे जीवन, सर्वस्व आहे”. कारण त्यानं जगणं, उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून आहे. त्या चाललेल्या कामाच्या आड येतात हे पाहून राजाचा सल्लागार असलेला गिरिधारी त्याने तिला पैसे देऊन फितवण्याचा प्रयत्न केला. पण अमृतादेवी मानायला तयार नव्हत्या झाडांवर कुराडीचे घाव बसत होते. ते पाहून अमृता देवींनी झाडाकडे धाव घेतली त्या झाडाला कवटाळून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या “माझ्या जीवनदानाने जर ही झाड जगणार असतील तर माझे प्राण द्यायला मी तयार आहे, चालवा कुऱ्हाड”. राजाच्या माणसांनी देखील कुऱ्हाडी चालवल्या त्या क्षणी अमृता देवींचे शिर धडावेगळ झालं. ते पाहून तिच्या दोन मुलींनीही दोन झाडांना कवटाळलं त्यांच्यावरही घाव घालण्यात आले. हे सर्व गावकऱ्यांनी पाहिल अमृता देवींचा यज्ञ पुढे चालू ठेवायचा असं एकमताने ठरवून ३६३ बिस्नोई धारातीर्थी पडले. हे पाहून राजाने झाडे तोडण्याचा हुकूम मागे घेतला. जगातले पहिले पर्यावरणवादी म्हणून बिश्नोईचा उल्लेख आढळतो.
साधारण १५ व्या शतकात राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विष्णोई पंथाचा उदय झाला. गुरु जांभेश्वर हे या पंथाचे आणि पर्यावरण वादाचे जनक. यांनी लोकांना जंगले, पाळीव प्राणी, रानटी प्राणी, पाणी, नद्या यांचे महत्त्व समजावलं.
वनांना लागलेला वनवा विझविताना, नक्षलवाद्यांशी लढताना, तस्करांशी दोन हात करताना, वन हक्कांसाठी लढताना अनेक जनांनी आपले प्राण दिले. १९९१ मध्ये वीरप्पनने केलेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय वन सेवेतील अधिकारी पी. श्रीनिवास यांचा मृत्यू झाला याचं स्मरण या निमित्ताने होते. पंचवीस वर्ष मागे चंद्रपूर जिल्ह्यातील टेकमांडवाच्या जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या विस्फोटामध्ये आठ जवान मारले गेले.
या आणि अशा बऱ्याच गोष्टींच स्मरण आपल्याला वन हुतात्मा दिनानिमित्त होते. परंतु याचं नुसतं स्मरण करून उपयोग नाही, तरी या सर्व लोकांनी निसर्ग संवर्धनासाठी प्राण त्यागले त्यांच्या इतकं नाही पण निसर्गासाठी थोडं जरी आपल्या कार्यातून दान देता आलं तर प्रत्येकाने द्यावं. दान हे निसर्ग सेवेच असाव. त्यासाठी सजग राहून आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातून या साऱ्याची सुरुवात करायला हवी. तेव्हाच वन हुतात्मा दिन सार्थकी ठरेल. प्रत्येकाने निसर्ग संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी घेतली तरच आपली पुढची पिढी निसर्ग पाहू शकेल व आरोग्य संपन्न जीवन जगेल हे लक्षात ठेवले पाहिजे.
गायत्री राजगुरव अवधानी
एम.एस.सी.एम.फिल (झूलॉजी)
वन्यजीव अभ्यासक