आरोग्य व शिक्षणसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे खंडेरायाची पत्रीपूजा मोठ्या उत्साहात संपन्न!!

पंचनामा लोणी धामणी प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरामध्ये भाद्रपद महिण्यातील प्रोष्ठपदी पौर्णिमा,भागवत सप्ताह समाप्ती संन्यासिना चार्तुमास्य निमित्ताने पारंपारिक पत्री व फूल,फळ अर्पण सोहळा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

मुख्य मंदिराच्या गाभार्‍यातील स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या परिसराचा करण्यात आलेला जिर्णोध्दार व गाभार्‍यातील फुलांची आकर्षक सजावट,स्वयंभू सप्तशिवलिंगाला केलेला सुवासिक अत्तर व केशरमिश्रीत भंडार्‍याचा लेप व सजवलेली खंडोबा,म्हाळसाई,बाणाईची लोभस मूर्ती पाहून भाविक सुखावल्याचे पाहायला मिळाले.

पहाटे सुवासिक फुलांनी सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक भंडार्‍याचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती मोगर्‍याच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर,कपाळभर भंडारा लावून “सदानंदाचा येळकोटचा” जयघोष करणारे भाविक आणि आबालवृध्द महिलाचा लक्षणीय सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण पारंपारिक भाद्रपद पौर्णिमेला पत्री,फुल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात भल्या पहाटेला दिसून आले.

भाद्रपद महिण्यातील येणार्‍या रिमझिम पाऊसाच्या वातावरणात पारंपारिक वाद्याच्या गजरात पूर्वापार चालत असलेल्या प्रथा आणि परंपराचे पालन करत धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात भाद्रपद पौर्णिमेच्या रविवारी पहाटे सुदर्शन शिंदे व सौ.प्रियांका शिंदे (शिंदेवाडी,एकलहरे ता.आबेगांव) निलेश वाळुंज व सौ. चंद्रकला वाळूंज (खडकवाडी,लोणी) संदीप शिंदे व सौ.सोनल शिंदे ( शिंदेवाडी,एकलहरे ) विठ्ठल गोपाळे व सौ.आरती गोपाळे (वाळुंजनगर लोणी) गणपत नानाबुवा विधाटे व सौ. मालन विधाटे (धामणी) पोपट विठ्ठल विधाटे व सौ.मंदाकिनी विधाटे (धामणी) आशिष गाढवे व सौ.माया गाढवे (धामणी) अविनाश बोर्‍हाडे व सौ.निलम बोर्‍हाडे (धामणी) दिलीप पंचरास व सौ.आशा पंचरास,अमित पंचरास व सौ.सुजाता पंचरास (धामणी) या नऊ जोडप्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करून पत्री,पुष्प व फळपूजा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,पांडुरंग भगत,नामदेव भगत,राहूल भगत,राजेश भगत,बाळशिराम साळगट,प्रमोद देखणे यांनी सप्तशिवलिंगावर पत्री व फुल फळ पूजा घालण्यास सुरुवात केली.

मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात मोगर्‍याचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली. सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा करुन झाल्यानंतर उपस्थित भाविक सेवेकरी ग्रामस्थाच्या कपाळाला भंडारा लावण्यात आला.त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

पत्री,फूल,फळ,अभिषेक पूजेचे मानकरी नऊ जोडप्यांचा सेवेकरी मंडळीनी मानाचे श्रीफळ व भंडारा देऊन सत्कार केला.भाद्रपद महिण्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी महाळूंगे पडवळ,गावडेवाडी,अवसरी खुर्द,लोणी,खडकवाडी,संविदणे,कवठे, पाबळ,तळेगांव ढमढेरे येथील भाविक आलेले होते.

पत्रीपुजा आणि निसर्ग संवर्धन-चैत्र
महिण्यातील गुढीपाडव्यापासून सर्वत्र श्री खंडोबाच्या चंदनऊटी,अष्टगंधऊटी,पुष्प पुजा,बिल्व (बेल) पूजा,हरिद्रागंध पुजा,पत्री पूजा,दवणा पुजा,धान्य पूजा,दहीभात पुजा,पंचामृत पुजा,भंडार व नागवेल पूजा,श्रीखंड पुजा अशा वेगवेगळ्या पारंपारिक पूजा आणि गाभार्‍यात फुलांची सजावट प्रत्येक महिण्याच्या पौर्णिमेला पहाटे करण्यात येत असल्याचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.पारंपारिक पत्री पुजेला अनन्यसाधारण महत्व असून या पत्री पुजेत पिंपळ,जाई,अर्जुन,रुई,कण्हेर,आंबा, आघाडा,डाळींब,तुळस,बेल,धोतरा,माका,मधुमालती,बोर,हादगा,जांभूळ,सिताफळ,कवठ या २१औषधी वनस्पतीच्या पानाची जुडी बांधून ती देवाला वाहाण्यात आली.

सध्या सर्वत्र देवराई व वनराईचा व निसर्गाचा र्‍हास होत आहे त्यामुळे कधी काळी रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध होणार्‍या पत्रीचा आता भाविकांना डोंगरदर्‍यात शोध घ्यावा लागत आहे. नवोदित पिढीला या पत्री ओळखणे अवघड झाले आहे.या पत्री शोधण्यासाठी डोंगरदर्‍यात जावे लागते.त्यामुळे या औषधी वनस्पतीच्या (पत्रीचा) संवर्धनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पत्रीची पाने श्री महादेव व श्री खंडोबाला प्रिय असल्याने व या पत्रीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने व ते भाद्रपद महिण्यात पूजेत वापरल्याने अरिष्ट संकट व गंडातरापासून मुक्ति मिळून आरोग्याचे लाभ मिळत असल्याची श्रध्दा या भाद्रपद महिण्यातील “पत्रीपूजेत असल्याचे सांगण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.