आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील काही रस्त्यांची झालीय चाळण!! उखडलेले डांबर, पडलेले खड्डे यातून शोधावा लागतोय रस्ता!!


पंचनामा लोणी (धामणी प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही रस्त्यांची फारच दयनीय अवस्था झाली.त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी जणूकाही या रस्त्यावरून न जाण्यासाठी अघोषीत बहिष्कारच टाकला आहे.दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करून खड्डीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील स्थानिक व छोट्यामोठ्या वाहान चालकांनी केली आहे.
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील गावठाण ते वरची धरण वस्ती या अंदाजे एक किलोमिटर रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्यावर पूर्वी खड्डीकरण व डांबरीकरण केले होते.आता हे खड्डीकरण व डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे.त्यामुळे सर्वच लहान मोठ्या वाहनचालकांना या खराब रस्त्याचा नाहक त्रास होत आहे.मांदळेवाडी ते सविंदणे (ता.शिरूर ) या रस्त्याची सुद्धा चाळण झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता दोन तालूक्यांना जोडणार महत्वाचा रस्ता असून जाण्यायेण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच धामणी फाटा ते खडकवाडी याही रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरीत डागडूजी करून डांबरीकरण करावे अशी जोरदार मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
तसेच वडगावपीर ते कामठेवाडी (ता. शिरूर) याही रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. तसेच वाळूंज नगर- डिंभे उजवा कालवा ते पोखरकर मळा क्रमांक तीन हा रस्ता खराब झाला आहे. वरील सर्वच रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे सांगा या भागातील नागरीकांनी जगायचे कसे ?

