ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न!!
जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा!!

ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न!!
जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा!!
दि. २५ (जिल्हा परिषद, ठाणे)- केंद्र शासन पुरस्कृत, “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” (ULLAS Navbharat Saksharata Karykram) सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून त्या व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करण्याच्या दृष्टीने नोंदणी झालेल्या असाक्षरांची सन २०२४-२५ मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार, दि. २३ मार्च, २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या २ हजार ३६५ होती. FLNAT परिक्षेस बसलेले असाक्षर महिला २० हजार २१९ तर पुरुष ५ हजार ७५७ असे एकूण २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी परीक्षा दिली आहे.
या परिक्षेत आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश होता. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नव-साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील, त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात 25 हजार 976 असाक्षर परिक्षार्थींनी परीक्षा दिली – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
यावेळी परीक्षा केंद्रावर परिक्षेकरिता उपस्थित झालेल्या परिक्षार्थींना ओवाळून, गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन, सुंदर रांगोळी रेखाटून स्वागत करण्यात आले. सर्व परीक्षा केंद्रांवर आनंददायी व उत्साही वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षा कामकाजाची पहाणी करणेसाठी केंद्र शासनातर्फे गगनकुमार कामत यांची ठाणे जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती. गगनकुमार कामत यांनी परीक्षा कालावधी दरम्यान मिरा भाईंदर मनपा आणि ठाणे मनपा येथिल निवडक परीक्षा केंद्रांना भेट देऊन नवसाक्षरांच्या सहभागाबाबत समाधान व्यक्त केले.
ठाणे जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेचे नियोजन करण्यात आले होते. तालुकास्तरावर, तहसीलदार व गटविकास अधिकारी या अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्षांसह प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ठाणे तसेच सहा महानगरपालिकांचे शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, पाच पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक व विशेष शिक्षक यांनी शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्या मदतीने नवसाक्षरांच्या परिक्षेची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
परिक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे परिक्षेची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत लवचिक ठेवण्यात आली होती. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी 3 तासांचा होता. दिव्यांग व्यक्तींसाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात आला. ठाणे जिल्ह्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलगू, तमिळ, गुजराती आणि कन्नड अशा आठ माध्यमातून परीक्षा देण्यात आली.
परीक्षेवेळी प्रौढ परीक्षार्थींना उत्साह व आत्मविश्वास अनुभवास आला. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळोली, केंद्र – कान्होर, तालुका – अंबरनाथ, जिल्हा – ठाणे येथील ७२ वर्षांच्या आजीबाईंनी मनोगतातून आपल्या या वयातील शिकण्याचा व परीक्षेबद्दलचा आनंदही व्यक्त केला.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र / गुणपत्रक देण्यात येईल. या परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबात / पाहुणे / नातेवाईक यांच्यामध्ये आपले कौतुक होईल. वेगवेगळ्या दुकानांमध्ये वस्तुची खरेदी करणेसाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक / पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही. यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असून या परिक्षेत महिलाचा सहभाग जास्त असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर यांनी दिली.