..आणि तब्बल ४८ वर्षानंतर ते माजी विद्यार्थी आले एकत्र…!!

..आणि तब्बल ४८ वर्षानंतर ते माजी विद्यार्थी आले एकत्र…!!
“मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय” असं म्हणत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज नं.१ येथे नुकतेच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सन १९७५ सालची जुनी अकरावी आणि त्यावेळी असणारे माजी विद्यार्थी यांचा आज तब्बल ४८ वर्षानंतर एकत्र येण्याचा योग या स्नेहमेळाव्यातून जुळून आला.जुन्या सुखद आठवणी माणसाला आपलं वय विसरायला लावतात.शाळेतले जुने मित्र-मैत्रिणी यांची भेट म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते.एकमेकांसोबत गप्पा गोष्टी रंगल्या.असाच एक आनंदाचा क्षण अनुभवला तो उंब्रज येथील माजी विद्यार्थ्यांनी.
या मेळाव्याची सुरुवात श्री महालक्ष्मी व मळगंगा मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.तांत्रिक हॉलमध्ये दिप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले.गुलाब चौधरी सर व श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज चे मुख्याध्यापक बी.व्ही.हांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सौ.मिरा भोर-शेळके या माजी विद्यार्थिनीने महाविद्यालयास संगणक भेट म्हणून दिला.
पुन्हा एकदा शाळेचा परिसर गजबजून उठला तो चाळीशी ओलांडलेल्या त्या माजी विद्यार्थ्यांनी…..
बेचा पाढा,पी टी चा तास,प्रार्थना, मधली सुट्टी,दप्तराचे ओझे,शाळेचा गणवेश,शाईचा पेन या सगळ्या जुन्या गोष्टी नकळतपणे डोळ्यासमोर दिसायला लागल्या.आज पुन्हा एकदा सर्वांना शाळेत शाळेत यावंसं वाटतंय.
आपले शिक्षक त्यांनी केलेले संस्कार,शिस्त यामुळेच आज प्रत्येक माजी विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वीपणे वाटचाल करत असल्याचे सौ.मिरा भोर-शेळके आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या.
शांताराम दांगट,शिवाजी,शिंगोटे जगन्नाथ हांडे,शामराव मोरे,निवृत्ती भिसे यांनीही आपली मनोगते व्यक्त करत शिक्षकांविषयी आपुलकी,सद्भावना व कृतज्ञता व्यक्त केली.या मेळाव्यासाठी तांत्रिक विभाग प्रमुख श्री मोरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम रसाळ आणि गोकुळ भोर यांनी केले तर आभार सिंधू हांडे यांनी मानले.