आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात डिंभे धरणाच्या वितरिका,उपवितरिका झाल्यात गायब!!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात डिंभे धरणाच्या वितरिका,उपवितरिका झाल्यात गायब!!!
शेतीप्रधान तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या आंबेगाव तालुक्यात डिंभे धरणाच्या पाण्यामुळे नंदनवन बहरले आहे. धरणाचा उजवा कालवा, डावा कालवा, घोडनदी, मिना नदी या जल स्त्रोतामुळे तालुक्यातील काही गावे वगळता बारमाही नगदी पिकांची रेलचेल दिसून येते आहे.
शेतीला बाराही महिने पाणी उपलब्ध झाले असले तरी शेतीला थेट पाणीपुरवठा व्हावा यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च मात्र पाण्यात गेला आहे. डिंभे धरणाच्या वितरीका,उपवीतरिका गायब झाल्या आहेत. ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष पाण्याची वाट पाहत आहेत अथवा झाडा झुडपाच्या गर्दीत हरवून गेल्या आहेत. याकडे ना शासनाचे लक्ष आहे ना संबंधित विभागाचे!!
अवसरी,मेंगडेवाडी,जारकरवाडी, पोंदेवाडी या परिसरातील बहुतांशी पोटचाऱ्या या मातीत मिसळून गेल्या आहेत. वास्तविक या कामासाठी केला गेलेला कोट्यवधीचा खर्च मातीमोल झाल्याचे चित्र दिसून येते आहे.