कीडरोग प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करा..

कीडरोग प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करा..
प्रतिनिधी-समीर गोरडे
“सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीमध्ये दिवसेंदिवस कमी होत जाते. त्यामुळे उगवणशक्ती तपासल्याशिवाय बियाण्याची पेरणीसाठी वापरू नये. ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी. सोयाबीन कीडरोग प्रतिबंध व उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करावी,’’ असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी केले आहे.
पारगाव तर्फे खेड (ता.आंबेगाव) येथे कृषी संजीवनी पंधरवडा प्रकल्प अंतर्गत तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडल कृषी अधिकारी वेताळ यांच्या सूचनेनुसार कृषी पर्यवेक्षक बिराजदार व सहाय्यक कृषि अधिकारी प्रमिला मडके यांनी सोयाबीन बियाण्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच हुमणी कीड नियंत्रण, सोयाबीन बीज प्रक्रिया, महाडीबीटी, बांधावरील फळ लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आदी बाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली,तसेच pmfme, बांधावर फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर, औजारे, ठिबक सिंचन, शेततळे इ.बाबत शेतकरी यांना माहीती दिली,या कार्यक्रमात सरपंच मा नंदाताई पानसरे ग्रामसेवक चारुशीला बोटरे महिला शेतकरी दिपाली सावंत सोनाली सावंत भारती सावंत, स्वाती सावंत, मंदा सावंत,वंदना सावंत,अनिता सावंत,प्रमिला सावंत,उर्मिला सावंत,शिला सावंत,निता सावंत, कविता सावंत, सचिन पवार, बाळकु मनकर, नथु अभंग आदी शेतकरी उपस्थीत होते.
बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगांचा आणि रोप अवस्थेत येणाऱ्या खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते. पिकाच्या उत्पादनात वाढ होते,’’ असे सहाय्यक कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी सांगितले. व उपस्थित शेतकरी यांचे आभार मानले ..