शेतकऱ्यांचे लागले आभाळाकडे डोळे!! पावसाअभावी टोमॅटोचे पीक अडचणीत!!!

शेतकऱ्यांचे लागले आभाळाकडे डोळे!! पावसाअभावी टोमॅटोचे पीक अडचणीत!!!
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचे डोळे सध्या आभाळाकडे लागले आहेत. मान्सूने दडी मारल्याने व मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने या परिसरातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे.
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर,पारगाव, काठापुर, शिंगवे, जारकरवाडी,धामणी,खडकवाडी, लोणी,पोंदेवाडी, लाखनगाव,जवळे, भराडी आधी गावांमध्ये नगदी पिकांचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते.सध्या शेतात गवार,टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, शेवगा या पिकांची रेलचेल आहे.रुसलेल्या मान्सूनचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे ती टोमॅटो या पिकाला!!
या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो या पिकाची लागवड केली जाते. परंतु यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्याने आणि चक्रीवादळामुळे मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अजून आठ दिवस पाऊस न झाल्यास लागवड केलेले टोमॅटोचे पीक हे जळून जाणार आहे याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसणार आहे.
टोमॅटो पिकासाठी लागणारा भांडवली खर्च हा मोठा असतो.टोमॅटोची लागवड केल्यापासून तर टोमॅटो विक्रीला येईपर्यंत येणारा बी बियाणांचा खर्च खते औषधे फवारणी आधी भांडवली खर्च हा मोठा आहे.
हा सगळा भांडवली खर्च करूनही चांगले उत्पादन आले तरी त्यातून चांगले उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसते. त्यात मान्सूनने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे. लवकरात लवकर मान्सूनचा पाऊस सक्रिय व्हावा अशी अपेक्षा या परिसरातील शेतकरी व्यक्त करतो आहे.