ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना मॉड्युलर पद्धतीचे कृत्रिम अवयव वाटप!!

ना.चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत दिव्यांगांना मॉड्युलर पद्धतीचे कृत्रिम अवयव वाटप
डॉ. सुरेश राठोड
कोल्हापूर/ प्रतिनिधी
सावली केअर सेंटर आणि भारत विकास परिषद पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील दिव्यांग बंधूंसाठी मोफत अत्याधुनिक मॉड्युलर पद्धतीच्या कृत्रीम हात व पाय या अवयव तसेच कॅलीपर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
त्याचा पहिला टप्पा म्हणून 12 मार्च 2023 रोजी सावली केअर सेंटरच्या पीरवाडी येथील प्रांगणात या उपक्रमासाठी आवश्यक असणार्या ‘शारीरिक मोजणीचा’ प्राथमिक कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांबरोबरच कोकण, गोवा, बेळगाव तसेच लातूर, बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यातूनही लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली. एकंदरीत 117 दिव्यांग बंधूंची मापे या कॅम्पमध्ये घेण्यात आली.
रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी याच उपक्रमाच्या पुढील टप्प्यामध्ये या सर्व लाभार्थ्यांना कृत्रीम अवयव वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये अवयव वाटपाबरोबरच ते वापरण्याचे प्रशिक्षणही लाभार्थ्यांना देण्यात आले. हे अत्याधुनिक कृत्रीम अवयव तसेच कॅलीपर्स सर्व लाभार्थ्यांना पुर्णपणे मोफत देण्यात आले.
हा उपक्रम भारत विकास परिषद आणि सावली केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने केला गेला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उच्च व तंत्रशिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भुषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत विकास परिषदेच्या प्रांत अध्यक्षा सि.ए. प्रविणा ओस्वाल यांनी केले. किशोर देशपांडे यांनी सावलीच्या अपंग क्षेत्रातील उपक्रमासंदर्भातील माहिती दिली. विनय खटावकर, केंद्रप्रमुख – विकलांग पुनर्वसन केंद्र यांनी सर्व दिव्यांग बंधूंना या कृत्रीम अवयव आणि त्यांच्या वापरासंदर्भातील समग्र माहिती दिली. या मॉड्युलर पायांची कमर्शिअल किंमत साधारणत: 40 ते 50 हजार रुपये असल्याचे सांगितले.या अवयवांची पुढील तीन वर्षांचे मेंटेनन्सही परिषदेतर्फे मोफत करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणीही दिव्यांग जर पुनर्वसन केंद्राच्या पुणे येथील नळस्टॉप केंद्रावर गेला असता त्याला वर्षभर कृत्रिम अवयव मोफत मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आभार प्रदर्शन भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखेचे प्रमुख मंदार जोग यांनी मानले. सुत्रसंचालन सावलीचे विश्वस्त महेश धर्माधिकारी यांनी केले.
याप्रसंगी बोलताना ना. चंद्रकांतदादांनी पुणे येथे दिव्यांगांसाठी खास प्रशिक्षण व्यवस्था तसेच रोजगारासंदर्भातील काम करणारी संस्था सुरु करण्याचे सुतोवाच केले. तसेच पुणे येथे सावली केअर सेंटरची शाखा सुरु करण्याचाही मानस व्यक्त केला. त्यासाठी पुण्याचे पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.दरवर्षी या पद्धतीचा किमान एखादा कार्यक्रम घेण्याचा दोन्ही संस्थांचा मानस आहे.कार्यक्रमास प्रकाश मेहता, राजन देशपांडे, राहूल चिकोडे, विजय जाधव, सुहास काणे, शैलेंद्र मेहेंदळे, राहूल करमरकर, माणिकराव चुयेकर पाटील, सुरेश खांडेकर, बाबूराव चौगूले, दिव्यांग आघाडीचे गजानन सुभेदार, डॉ. आनंद ढवळे, रामचंद्र टोपकर या मान्यवरांनी उपस्थिती लावली.