आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार!!

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार!!
———————————————-
बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला असून महाराष्ट्राला आनंदवार्ता दिली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मान्सूनरेषा गोवा ओलांडून रत्नागिरीपर्यंत पोहोचली आहे, मात्र मान्सूनच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मान्सून रविवारी मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा आणखी काही भाग, गोवा, दक्षिण कोकण, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा पश्चिम-मध्य भाग तसेच वायव्य भाग आणि ईशान्येकडील उर्वरित भाग येथे दाखल झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. महाराष्ट्रात मान्सून ९ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज होता. सर्वसाधारणपणे १० जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होतो. सरासरी तारखेपेक्षा राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी एका दिवसाचा विलंब झाला आहे. त्यानंतर मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे ११ जूनपर्यंत मान्सून पोहोचतो. मात्र यंदा मुंबईला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईमध्ये यंदा मान्सून दाखल व्हायला १४ जून उजाडू शकतो, अशीही शक्यता आहे.

मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यासाठी मुंबईत अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. रविवारी मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. रविवारी संध्याकाळपर्यंत दक्षिण मुंबईमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली. शनिवारीही मुंबईत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची उपस्थिती होती. चक्रीवादळामुळे मुंबईतील आर्द्रता खेचली जात असल्याने मुंबईत अजूनही पावसाची फारशी उपस्थिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी मुंबईत ११ जून रोजी, सन २०२१मध्ये ९ जून रोजी, तर २०२०मध्ये १४ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. २००१पासून उपलब्ध माहितीनुसार, सन २००९मध्ये सर्वांत उशिरा म्हणजे २१ जून रोजी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले होते. त्यानंतर सन २०१६मध्ये २० जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते.

मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस!!

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये आज, सोमवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर १३ जून ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींचाच अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मान्सूनचा पुढचा प्रवास रखडणार का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.