धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबाच्या गाभार्यात गुरुपौर्णिमा निमित्ताने फुलांची आरास !!


पंचनामा लोणी धामणी प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरामध्ये गुरुवारी (१०जुलै २५ ) आषाढी गुरुपौर्णिमा व चातुर्मास्यारंभ कुलधर्म मन्वादीची पारंपारिक पुष्प (फुल) व फळ पूजा उत्सव साजरा करण्यात आला.
फुलांची आकर्षक सजावट, सप्तशिवलिंगाला केलेला सुवासिक अत्तर व केशरमिश्रीत भंडार्याचा लेप सजवलेली,खंडोबा,म्हाळसाई,बाणाईची लोभस मूर्ती पाहून भाविक सुखावल्याचे पाहायला मिळाले.

पहाटे सुवासिक फुलांनी सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक भंडार्याचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती मोगर्याच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर पारंपारिक वाद्याचा व टाळ मृदंगाचा गजर कपाळभर भंडारा लावून हरिनामाचा जयघोष करणारे भाविक आणि आबालवृध्द महिलाचा लक्षणीय सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण आषाढी पौर्णिमेला फुल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात गुरुवारी भल्या पहाटेला दिसून आले.

चैत्र महिण्यात उन्हाचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून देवाला शीतलता मिळावी यासाठी चैत्री पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यत चंदनउटी,अष्टगंधउटी,हरिद्रागंध उटी,फळ,पूजा घालण्याची परंपरा आहे.देवाच्या मूर्तीला चंदन उटी,अष्टगंधउटी,हरिद्रागंध उटी,फळपूजा भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते.
आषाढ महिण्यातील पौर्णिमेला भंडाराउटी व फुल व फळ पुजा सोहळ्याच्या दिवशी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात टाळमृदंगाच्या गजराने व हरी नामाच्या जयघोषाने मंदिर व परिसरात आनंदी वातावरण दिसून आले.चैत्र शुध्द प्रतिपदेपासुन चंदनउटी,हरिद्रागंधउटी व फळपूजेचे व पुष्प पुजेचे कार्यक्रम केले जातात.यंदा १३मे पासून अचानक पाऊसाला सुरुवात झालेली असल्यामुळे रिमझिम पाऊसाच्या वातावरणात पूर्वापार चालत असलेल्या प्रथा आणि परंपराचे पालन करत हा धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता चंद्रकांत जाधव व शालीनी जाधव (धामणी) विष्णू गायकवाड व सौ.निर्मला गायकवाड (लोणी) सतीष टाव्हरे व सौ.वनिता टाव्हरे (अवसरी बुद्रुक) सुरेश वाळूंज व सौ.वनिता वाळूंज (खडकवाडी,लोणी ) राजेंद्र देवडे व सौ.आरती देवडे (जारकरवाडी) रामदास मैड व सौ.सिमा मैड( धामणी ,सुनिल जाधव व सौ. जिजा जाधव (धामणी) गणेश तांबे व सौ.वदना तांबे (शिरदाळे) श्री व सौ. सुभाषराव नरके (तळेगांव ढमढेरे) रभाजी गावडे व सौ. शांताबाई गावडे ( गावडेवाडी) या नऊ जोडप्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करून भंडारा उटी पुष्प व फळपूजा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,शांताराम भगत,पांडुरंग भगत,नामदेव भगत,धोंडीबा भगत,राहूल भगत,राजेश भगत,बाळशिराम साळगट,अनिरुध्द वाळुंज,दिनेश जाधव यांनी सप्तशिवलिंगावर भंडार्याची उटी व फुल पूजा घालण्यास सुरुवात केली. सुवासिक भंडार्याचा लेप देत असताना मंदिराच्या सभामंडपात पारंपारिक वाद्याच्या निनादात सदानंदाचा येळकोटच्या जयघोषाची सुरुवात करण्यात आली.

मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली. सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा करुन झाल्यानंतर उपस्थित भाविक सेवेकरी ग्रामस्थाच्या कपाळाला भंडार्याचा मळवट लावण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

भंडारा उटी फुल व फळ पुजेमुळे देवस्थान व परिसरातील वातावरण आपोआप आध्यात्मिक उर्जेने ढवळून निघाल्याचे दिसून आले.आषाढ महिण्यातील गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी महाळूंगे पडवळ,गावडेवाडी,अवसरी खुर्द,लोणी,खडकवाडी,संविदणे,कवठे पाबळ,तळेगांव ढमढेरे येथील भाविक आलेले होते.


