धामणीच्या खंडोबाला चांदीची खडग (तलवार) अर्पण!!

धामणीच्या खंडोबाला चांदीची खडग (तलवार) अर्पण!!
आचार, विचार आणि संस्काराने समृध्द असलेल्या जुन्या पिढीने धार्मिक संस्कृतीची जोपासना केली.हे संस्कार पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी व संस्कृती जोपासण्यासाठी नव्या पिढीत देखील विचारांची समृध्दी यायला हवी असे विचार ह.भ.प.हिरामण महाराज करडीले (रामलिंग,शिरूर) यांनी व्यक्त केले.
धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात माघ शुक्ल पक्ष वसंत पंचमी रविवारी दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी समाजभूषण कै. बाबुरावदादा पाटील यांचे नातु श्री. विक्रम किसनराव पाटील जाधव यांनी खंडोबाला चांदीची तलवार अर्पण करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धामणी येथील श्री खंडोबा देवस्थानाचे महात्म्य खूप मोठे आहे.राज्यभरातील हजारो भाविक येथे तळीभंडार करण्यासाठी येतात.गेल्या काही वर्षात या देवस्थानाचा लोकवर्गणीतून विविध विकासकामे करुन मंदिर परिसर सुशोभित झाला आहे. महाराष्ट्रातील जागृत व प्रेक्षणीय तिर्थक्षेत्र म्हणून धामणीचे खंडोबा देवस्थानने लौकीक पात्र केलेला आहे.
पुणे,नगर,नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे हे देवस्थान कुलदैवत आहे.जिर्णोध्दाराचे काम पाहिल्यानंतर धामणी ग्रामस्थानी भारतीय संस्कृतीचा वारसा लोकवर्गणीतून जतन केलेला आहे.मणी आणि मल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी श्री खंडेरायाने आपल्या सात कोटी सैन्यासह या दानवाबरोबर घनघोर युध्द केले त्यामुळे कानडी भाषेमध्ये “७” या संख्येला “येळ” या नावाने संबोधले जाते.येळकोट म्हणजे सात कोटीचे सैन्य होते.मणी आणि मल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी खंडोबाने तलवारीचे शस्र वापरले होते,तिचे नाव खंडा असे आहे.त्यामुळेच येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणण्याची पध्दत रुढ झाली असा हा चांदीचा खंडा (तलवार) देवस्थानास अर्पण करुन खंडोबा भक्तांनी खंडोबाची निस्सीम कृपा संपादन केली असल्याचे करडीले यांनी यावेळी सांगितले.
चांदीची तलवार अर्पण करणारे भाविक श्री विक्रम पाटील जाधव यांचा यावेळी ग्रामस्थांनी सत्कार केला.यावेळी देवस्थानचे सेवेकरी धोंडीबा भगत,दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,शांताराम भगत,सुभाष तांबे,राजेश भगत,नामदेव भगत,पांडुरंग भगत,राहूल भगत,उत्तमराव जाधव,अजित बोर्हाडे,मच्छिंद्र वाघ,कांताराम तांबे,प्रकाश पाटील,ज्ञानेश्वर जाधव (वाघे),सिताराम जाधव (वाघे),दिनेश जाधव,अशोक जाधव,नामदेव पवार,सुरेश वीर,वसंत बोर्हाडे,सुभाष सोनवणे उपस्थित होते.अर्पण सोहळ्याचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.