आंबेगाव तालुक्यातील हा पूल ठरतोय वाहतुकीसाठी अडचणीचा!!

आंबेगाव तालुक्यातील हा पूल ठरतोय वाहतुकीसाठी अडचणीचा!!
काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील वैदवाडी फाटा ते पोंदेवाडी या रस्त्यावर काठापुर गावच्या हद्दीत असणा-या कालव्याच्या पूलाची उंची कमी असल्याने त्या पुलाखालून प्रवास करताना अडथळा येत आहे. विशेष म्हणजे पुल हा 20 वर्ष बंद आहे. कालव्यावरील पूल काढून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी प्रवासी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.
काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीमधुन अवसरी फाटा- अवसरी -मेंगडेवाडी – जारकरवाडी फाटा- वैदवाडी फाटा तिथून पुढे पोंदेवाडी व काठापूर किंवा अष्टविनायक महामार्गाला येण्यासाठी रस्ता आहे. सदर रस्ता पूर्वी छोटा होता.परंतु मागील वर्षे भरात महिन्यांपूर्वी या ठिकाणी रुंद व मोठा रस्ता झाला आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असते.निरगुडसर,पारगाव मार्गे मंचर ला जाण्यासाठी शिरूर कडून येणारे अनेक वाहने गर्दीचा रस्ता टाळण्यासाठी,शिरूर वरून अष्टविनायक महामार्गाने आल्यानंतर काठापूर गावच्या हद्दीत हनुमान चौक पोंदेवाडी फाटा या ठिकाणावरून वळन घेऊन नवीन रुंदीकरण झालेल्या रस्त्याचा वापर करतात.
हा रस्ता वैदवाडी वरून मंचरकडे येत असतात. या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर सध्या होऊ लागला आहे. गुगल मॅप वर सुद्धा हा रस्ता अनेक वाहनांना दिशादर्शक ठरतो. त्यामुळे अनेक वाहनचालक मोबाईलवर गुगल मॅप मध्ये दाखवलेल्या रस्त्याचा वापर करून जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर करतात.
परंतु काठापुर बुद्रुक गावच्या हद्दीमध्ये गणेशवस्ती या ठिकाणी डिंभे उजव्या कालव्याच्या पारगाव वितरिकेला काठापूर गावासाठी एक वितरिका काढण्यात आलेले आहे. ही वितरिका करत असताना जमिनीच्या वरून पुल करून पाणी नेलेले आहे. गेल्या 20-25 वर्षांपूर्वी या वितरीकेचे काम केलेले आहे.पुर्वी या रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे या वितरीकेच्या पुलाखालून अनेक वाहने येजा करायची.परंतु सध्या वाहतूक वाढल्याने अनेक मोठी वाहने या रस्त्याचा वापर करतात.
हा वापर करत असताना उंच सामान भरलेली वाहने या पुलाला ठोकरतात. आणि त्यामुळे अपघाताची ही शक्यता वाढली आहे.सदर वितरीकेला गेल्या पंचवीस वर्षात अजूनही पाणी आलेले नाही. त्यामुळे सदर वितरिकेचा उपयोग काठापुर गावच्या शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे हा पूल असून अडचण झाली आहे.त्यामुळे सदर वितरिकेचा पुल काढून टाकावा अशी मागणी काठापूर ग्रामस्थ व वाहतूक करणारे अनेक वाहनचालक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य तो मार्ग काढून सदर वितरीके वरील पूल काढून टाकावा अशी मागणी होत आहे.