मंचर – शिरूर मार्गावर दिशादर्शक फलक बसवल्याने वाहन चालकांसह प्रवाशांनी व्यक्त केले समाधान!!
मंचर – शिरूर मार्गावर दिशादर्शक फलक बसवल्याने वाहन चालकांसह प्रवाशांनी व्यक्त केले समाधान!!
आंबेगाव व शिरूर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा रस्ता म्हणजे मंचर – अवसरी – पोंदेवाडी फाटा हा रस्ता!! काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. कामाची गुणवत्ता उत्तम राखली असल्याने मंचरहून मलठण,शिरूर, शिक्रापूर, रांजणगावला जाण्यासाठी वाहनचालक या मार्गाचा वापर करत आहेत.मात्र घोडखणा (झांजूर्णेबाबा मंदिर) ते पोंदेवाडी फाटा या रस्त्यादरम्यान दिशादर्शक फलक, वळणे,अरुंद पुल, वेगमर्यादा आदी दिशा दाखवणारे फलक नसल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होते.संबंधित विभागाच्या वतीने या मार्गावर फलक लावण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी तसेच प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
हा मार्ग पुढे जाऊन अष्टविनायक,बेल्हा – जेजुरी या महामार्गाला मिळतो.शिक्रापूर, रांजणगाव या एम.आय.डी.सी.नाशिक शहराला जोडण्यासाठी हा महत्वाचा मार्ग बनला आहे. या शिवाय शिरूर भागातील नागरिकांना व विद्यार्थांना मंचर,अवसरी,घोडेगाव,लांडेवाडी आदी गावांत शैक्षणिक, प्रशासकीय कामांसाठी, शेतमाल विक्रीसाठी या मार्गाचा वापर सोयीचा ठरतो आहे.या मार्गाची बहुतांश गैरसोय टळली आहे याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. माञ रस्त्याच्या दुतर्फा आणवश्यक वाढलेली खुरटी झाडी झुडपे काढून टाकण्याची गरज असल्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.