समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न!!

समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह दिनांक २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.या सप्ताहाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ.लहू गायकवाड यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासने,समर्थ लॉ कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश कडलग,सर्व महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी,प्राध्यापक वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. वक्तृत्व स्पर्धा,पोस्टर सादरीकरण स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा त्याचबरोबर रासेयो शिबिरार्थींनी कॅम्पस मध्ये रॅली काढून पोस्टरद्वारे ज्वलंत विषयावर आधारित तयार केलेली घोषवाक्ये व राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले.नेतृत्व गुणविकास,राष्ट्रभक्ती,स्वयंशिस्त,आत्मनिर्भरता,आत्मविश्वास,स्वावलंबन त्याचप्रमाणे इतरांना काही देण्याची सवय इत्यादी गुण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे यावेळी डॉ.लहू गायकवाड म्हणाले.समप्रमाणात विचार करून सद्गुणांचा अंकुर फुलवून योग्य परिस्थिती निर्माण करणे हे एका राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्याचे प्रतीक आहे.योग्य वयात योग्य कामे करून यश प्राप्ती करता येते तसेच विद्यार्थ्याला जर वैचारिक भूक भागवायची असेल तर साहित्याचे वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अभ्यासाची व प्रयत्नांची धार सतत असल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.छत्रपती शिवरायांच्या विचारांचे महात्म्य सांगून,जमीन नांगरण्यापासून धान्य घरात येण्यापर्यंतची हमी देणारी स्वराज्ययंत्रणा छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली होती.या शिव जन्मभूमीत आज आपण वाढतोय,शिक्षण घेतोय हे आपले सौभाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह साजरा करत असताना,विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये समरस होऊन आपल्यातील सकारात्मक गुणांचा विकास करावा.नेतृत्व गुणांची जोपासना करणारी कार्यशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना होय शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गौरी भोर यांनी प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.