पिंपरखेड परिसरात बिबट्याचा हल्ला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू


पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे
पिंपरखेड (ता. शिरूर) – येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. २ नोव्हेंबर) दुपारी उघड्यावर शौचालयासाठी गेलेला रोहन विलास बोंबे (वय १२, रा. आंबेवाडी, पिंपरखेड) याच्यावर बिबट्याने झडप घालून त्याला ठार केले. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी याच गावातील शिवन्या शैलेश बोंबे (वय ५) हिचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात चार बिबटे जेरबंद झाले होते, त्यामुळे धोका टळल्याचे मानले जात होते. मात्र, आजच्या घटनेने पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
रोहनच्या मृत्यूनंतर पिंपरखेड आणि जांबुत परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांत तीव्र संताप आहे. ग्रामस्थांनी पूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन नागरिकांचे सांत्वन केले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजना निश्चित करण्यासाठी बैठक घेतली होती. तसेच केंद्रीय वनमंत्र्यांशी बिबट्याची नसबंदी आणि इतर उपाययोजनांवर चर्चा झाली होती. तरीही हल्ले सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये वनखात्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.पंधरा दिवसात दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होणे ही अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे. प्रशासन आणि वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून नागरिकांचा जीवितधोका टाळावा. अन्यथा संतप्त ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.





