आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथे भक्तिमय वातावरणात संपन्न होतोय काकड आरती सोहळा!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) गावात भक्तिमय वातावरणात काकड आरती चा सोहळा संपन्न होत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो.
पारगाव (शिंगवे) येथील ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिरात भक्तीमय वातावरणात गेली ४० वर्ष हा काकड आरती सोहळा संपन्न होत आहे.पुर्वी सर्व गावकरी,परिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. पण जग बदलले.आधुनिक युगात प्रगती झाली. अलिकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली.मात्र पारगाव याला अपवाद ठरले आहे.आजही पारगावात गावातील तरुण,ज्येष्ठ पुरूष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात.

गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ, मृदूंगाच्या तालावर भजने,गवळनी गायली जातात.आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.पहाटेच्या समयी गावातील भाविक उठून,स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात.पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी.आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरतीमागील उद्देश असल्याचे पारगाव ग्रामस्थानी पंचनामाशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ह.भ.प.कै.किसनराव बाळाजी ढोबळे, कै.बाबुराव पोंदे,कै.गजानन ढोबळे, कै महादुबाबा ढोबळे,कै.दशरथ बाळाजी ढोबळे, कै.नानाभाऊ लोखंडे,कै.भगवंत बाबा लोखंडे या व अशा अनेक गुणीजन्याच्या माध्यमातून या काकडा भजन मंडळाला सुरवात ४० वर्षांपासून करण्यात आली आहे.

या मध्ये आता वाढ होवून गावातील ह.भ.प.माऊली बाबा ढोबळे व ह.भ.प.खंडु महाराज दातखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न होत आहे.



