जपानच्या शिष्टमंडळाची पुणे म्हाडाला भेट !!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – जपानी अर्बन रेनेसन्स एजन्सीचे डायरेक्टर ओकामुरा टोमोहितो, सेक्शन चीफ आर्किटेक्ट होरीता योजी, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रेसिडेंट समीर खळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याच्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत मुख्यत्वे राज्यातील शासकीय पुनर्विकासाच्या योजना किंवा सरकारी जागांवर प्रकल्प राबविणे यासारख्या कामांसाठी जपानकडून गुंतवणूक करण्याबरोबरच जपानी तंत्रज्ञान वापरण्याबाबत चर्चा झाली. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना आवर्जून म्हाडा प्राधिकरणाला भेट देण्याचे सुचविले होते. त्यानुसार काल या शिष्टमंडळाने म्हाडा प्राधिकरणाला भेट देऊन आज पुणे मंडळास भेट दिली. आज म्हाडा पुणे मंडळामध्ये त्यांच्याशी सुमारे एक तासभर विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली अशी माहिती मा.खा.पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांनी दिली.

यावेळी झालेल्या बैठकीत आढळराव पाटील यांच्या समवेत पुणे मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे तसेच पुणे शहरातील गोयलगंगा ग्रुपचे नामवंत विकसक अतुल गोयल, पुणे मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान त्यांना पुणे शहरातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत आढळराव पाटील यांनी माहिती दिली. खासकरून प्रधानमंत्री आवास योजना 2.0 या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेला अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी त्यांनी सकारात्मक सहभाग घ्यावा असे आढळराव पाटील यांनी आवाहन केले.बांधकाम व्यवसायात जपानी तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे वापर केला जातो याच्याशी निगडित माहिती आढळराव पाटील यांनी सविस्तरपणे जाणून घेतली.

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी कशाप्रकारे घरे पुरविली जातात म्हाडाची कार्यप्रणाली कशी आहे याबाबत त्यांना सविस्तर माहिती यावेळी पाहुण्यांना देण्यात आली.



