आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांची दहशत कायम!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही.पारगाव (शिंगवे) येथील चिचगाई मळ्यातील शेतकरी श्री. मच्छिंद्र कुटे यांच्या राहत्या घरासमोर बांधलेल्या वासरावर मध्यरात्री अडीचच्या बिबट्याने हल्ला करून वासराला जखमी केले आहे.
रात्री बिबट्याने वासरावर हल्ला केल्यानंतर वासराचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्वप्नील कुटे व घरातील सदस्य बाहेर आले. बिबट्या वासरावर बसलेला त्यांना दिसून आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाला.
घटनास्थळी पारगावचे मा.उपसरपंच श्री.विठ्ठल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका ढोबळे यांनी भेट देऊन वनविभागाच्या वनरक्षक पूजा कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. तसेच या परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे व ग्रामपंचायत सदस्य प्रियांका ढोबळे यांनी वनविभागाकडे केली आहे. आज संध्याकाळ पर्यंत पिंजरा लावण्यात येईल असे वनरक्षक पूजा कांबळे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

या वेळी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य प्रियांका ढोबळे, वनरक्षक पूजा कांबळे, सुनील चांगन, गोरक्ष ढोबळे उपस्थित होते.