शिरदाळे (आंबेगाव ) येथे पेरणी अंतिम टप्प्यात,बटाटा लागवड यंदाही मंदावण्याची शक्यता !!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले शिरदाळे परिसरामध्ये पेरणी अंतिम टप्प्यात आली असून यंदा देखील बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कमी कल असल्याचे पाहायला मिळत आहे.
संपूर्ण मे महिन्यात झालेल्या भरपूर पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदी असून पावसाने सुरवात चांगली केल्यामुळे आणि तीन चार दिवसांची उघडीप दिल्यामुळे ९०% पेरणी पूर्ण झाली असून पुढील दोन दिवसात १००% पेरणी पूर्ण होणार आहे.

ज्या क्षेत्रावर बटाटा लागवड करायची आहे तेच क्षेत्र बाकी आहे परंतु यंदा देखील बटाटा लागवडीत मोठी घट होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.बाबाजी चौधरी,निवृत्ती मिंडे,सुरेश तांबे,कचर तांबे हे शेतकरी वगळता बाकी शेतकऱ्यांची लागवड ही कमी प्रमाणात असणार आहे.तर भांडवल खर्च जास्त असल्यामुळे आणि उत्पन्न कमी यामुळे बटाटा लागवडीचे प्रमाण कमी झाल्याचे कांताराम तांबे,कोंडीभाऊ तांबे,राघू रणपिसे,संभाजी सरडे,केरभाऊ तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.

तर शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय वाढल्यामुळे शेतात जनावरांचा चारा मग त्यामध्ये मका करण्यावर शेतकऱ्यांचा कल असल्याचे दूध उत्पादन शेतकरी शुभम तांबे,सचिन तांबे,ज्ञानेश्वर तांबे,सुरेश तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचबरोबर सोयाबीन,उडीद,मूग, वाटाणा आणि भुईमूग पेरणी करण्यात आली असल्याचे मचिंद्र चौधरी,तात्याभाऊ चौधरी,निवृत्ती तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.

पाऊसमान चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करण्यावर भर असून बैलांची शेती बुडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे ट्रॅक्टर व्यावसायिकांना भरपूर मागणी असून पेरणीसाठी ट्रॅक्टर अपुरे पडत असल्याचे ट्रॅक्टर व्यावसायिक बाळासाहेब रणपिसे,भुपेंद्र तांबे,श्रीकांत मिंडे,सुहास रणपिसे,राजेंद्र चौधरी,संतोष तांबे यांनी सांगितले.

बटाटा लागवडीला भांडवल जास्त असल्यामुळे कमी प्रमाणात लागवड होत असून पीक हातात येईपर्यंत गोळाबेरीज केली तर हातात येणारे उत्पन्न हे देखील खूप कमी असते.शिवाय मजुरांचा तुटवडा खतांच्या महागलेल्या किंमती यामुळे देखील एकेकाळी बटाटा आगार अशी ओळख असलेले आमचे शिरदाळे गावातील शेतकरी बटाटा लागवड करायला म्हणावे तशी हिम्मत करत नाहीत.
श्री.मयुर संभाजी सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)