अवसरी बु.(ता.आंबेगाव) येथे पारंपारिक वाद्य वाजवीत आंदोलन !!


पंचनामा अवसरी प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे महसूल प्रशासनाच्या विरोधात जमिनी बळजबरीने ताब्यात घेतल्याच्या कारणावरून मातंग समाज बांधवांनी तलाठी कार्यालयासमोर पारंपारिक वाद्य वाजवत,घोषणा देत आंदोलन केल्याची माहिती अवसरी बुद्रुक येथील मातंग समाजाचे कार्यकर्ते संग्राम गायकवाड यांनी सांगितले.
या आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,गायकवाड कुटुंबियांची जमीन व घरे अवसरी बुद्रुकच्या उत्तरेला आहेत.या घरांच्या बाजूला त्यांच्या शेतजमिनी आहेत.अवसरी बुद्रुक येथील तलाठी व मंडल अधिकारी यांनी काही लोकांना हाताशी धरून त्यांच्या जमिनी दुसऱ्यांच्या नावावर केल्या आहेत.महसूल प्रशासन या मातंग समाजावर बळजबरी करीत आहेत.त्यामुळे सोमवारी (ता.९ ) रोजी समाजाने एकत्र येऊन तलाठी कार्यालयासमोर पारंपारिक वाद्यांच्या गजरात घोषणा देत आंदोलन केले.
या मागासवर्गीय समाजाने आंदोलनाच्या दोन दिवस आधी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन व संबंधितांना आंदोलनासंदर्भात निवेदन दिले होते.मात्र त्यांची कुणीही दखल घेतली नाही.आंदोलनाची धार तीव्र होताच तेथील तलाठी व कोतवाल यांनी कार्यालयाला कुलूप ठोकून पोबारा केला.

अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव )येथे तलाठी कार्यालयासमोर पारंपारिक वाद्य वाजवत मातंग समाजाने आंदोलन केले.