आई,वडील हेच सर्वस्व!! तेच तुमची ताकत अन तुमचा आदर्श !!

आई,वडील हेच सर्वस्व!! तेच तुमची ताकत अन तुमचा आदर्श !!
प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात शिकत असताना आपल्या आईवडिलांचा आदर्श,त्यांचे कष्ट डोळ्यसमोर ठेवून अभ्यास करावा व आपल्या आईवडिलांनी जी आपल्या मुलांच्या संदर्भात स्वप्ने पाहिली ती पूर्ण करावी मग त्यासाठी विद्यार्थ्यांना कितीही कष्ट करावे लागले तर ते त्यांनी करावे असे प्रतिपादन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ.किरण भालेकर यांनी केले.निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील ज्यूनिअर कॉलेज येथे दहावी व बारवीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ कार्यक्रमात डॉ.भालेकर बोलत होते.
यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आईवडीलांचे अनेक भावनिक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडताना विद्यार्थी सुद्धा भावनिक झाले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खूप-खूप मोठे व्हा सांगाताना आयुष्यात आईवडिलांना विसरू नका असे भावनिक आवाहान केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या विद्यालयाला,आई वडिलांना व गुरूंना कधीही विसरू नका असा संदेश दिला.यावेळी संस्थेचे उपाध्याक्ष रामदास वळसे पाटील,सचिव प्रकाश तापकीर,संचालक श्रीकांत पवार, माजी प्राचार्या सुनंदा गोरे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी इंग्लिश स्पिकिंग संगणक क्लासचे मान्यवरांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत एक लेक्चर टेबल (डेस्क ) सप्रेम भेट देण्यात आला.यावेळी नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पर्यवेक्षक संतोष वळसे व वैशाली वाबळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मोहन दरेकर यांनी मानले.